देगलूरनांदेडमराठवाडामहाराष्ट्र

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप

आर्थिक दुर्बल घटक आणि विविध मागास प्रवर्गातील ६४ विद्यार्थिनींची निवड

Lokurja Digital

देगलूर | प्रतिनिधी

देगलूर – मानव विकास योजनेंतर्गत इयत्ता ८ वी ते १० वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या ६४ विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलींचे वाटप करण्यात आले. साधना विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे शहरातील आर्थिक दुर्बल मागासवर्गीय विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोठी प्रेरणा मिळणार असून, त्यांच्या शाळेतील नियमित उपस्थितीलाही चालना मिळणार आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील मुलींना शिक्षण घेताना प्रवासाची अडचण निर्माण होऊ नये आणि आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने शासनाच्या मानव विकास योजनेंतर्गत सायकल वाटप करण्यात येते. त्याच अनुषंगाने साधना शाळेतील ६४ पात्र विद्यार्थिनींची निवड करून त्यांना सायकली प्रदान करण्यात आल्या.

यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विविध मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वाय. एस. बत्तुरार होते. यावेळी उपमुख्याध्यापक बी. एन. सुगांवकर, पर्यवेक्षक बी. डी. गोणे , धुळगंडे सर, तंगावार सर, डोमाटे सर, सुकणे सर व सर्व मान्यवर शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे आवाहन करण्यात आले. सायकल मिळाल्यामुळे शाळेत येण्यासाठी लागणारा वेळ व प्रवासाचा खर्च कमी होणार असून, विद्यार्थिनींच्या शिक्षणाला याचा निश्चितच फायदा होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.सायकली मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

शाळेपासून लांब राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे. “सायकल मिळाल्यामुळे आता शाळेत नियमित येणे अधिक सोपे होणार असून शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येईल,” अशी भावना साधना शाळा, देगलूरच्या विद्यार्थिनींनी व्यक्त केली. मुख्याध्यापक बत्तुरवार त्यांनी मानव विकास योजनेंतर्गत मिळालेल्या या सुविधेबद्दल शासनाचे आभार मानले.

तसेच विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थिनींना मिळालेल्या या सायकलींमुळे “मुली शिकल्या, तर समाज पुढे जाईल” या संकल्पनेला अधिक बळ मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button