देगलूरनांदेडमराठवाडामहाराष्ट्र

सरस्वती विद्यालयमच्या चिमुकलीचा शिक्षणाच्या प्रश्नावर देश हादरवणारा संदेश..!

देगलूरच्या ४ वर्षांच्या चिमुकलीच्या हातात 'Please Save My Future'!

Lokurja Digital

देगलूर | प्रतिनिधी

देगलूर – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला.

या घटनेच्या निषेधार्थ आज, २३ जुलै रोजी, देगलूर शहरात सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या वतीने देगलूर बंदची हाक देण्यात आली.बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. बाजारपेठेतही बंदचा परिणाम दिसून आला. विविध संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनादरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे देगलूर येथील सरस्वती विद्यालयातील LKG मध्ये शिकणारी अवघी चार वर्षांची ओवी बालाजी अटमलवार. या चिमुकलीने हातात “Please Save My Future” असा फलक घेत दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतीकात्मक पाठिंबा दर्शविला.

अवघ्या ४ वर्षांच्या मुलीच्या हातातील हा संदेश अनेकांना विचार करायला भाग पाडणारा ठरला. शिक्षण, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखविण्याची गरज या घटनेतून अधोरेखित होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवादाऐवजी संघर्षाचे वातावरण निर्माण होणे दुर्दैवी असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. देशाच्या भवितव्याचा प्रश्न असलेल्या शिक्षण क्षेत्रातील समस्या तातडीने सोडवून विद्यार्थ्यांच्या भविष्याला न्याय मिळावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button