
Lokurja Digital
देगलूर – तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ-खेळण्याचा प्रकार देगलूर शहरातील ‘कॉलिटी बेकरीत’ चालू आहे. या बेकरीत खाद्यपदार्थ खाण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाच्या मस्का पावात चक्क मृत झुरळ सदृश्य किडा निघाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदरील धक्कादायक प्रकार २६ जून रोजी घडले असून, क्वालिटी बेकरीतील अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी काही ग्राहक नेहमीप्रमाणे देगलूर येथील कॉलिटी बेकरीमध्ये मस्का पाव, केक खाण्यासाठी गेले, त्यांनी ऑर्डर केलेला मस्कापाव खाण्यास सुरुवात केली असता, पावाच्या आत एक मोठे झुरळ सदृश्य किडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच ग्राहकांस धक्का बसला. त्यांनी तात्काळ हा गंभीर प्रकार बेकरी चालकाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, बेकरी मालकांकडून यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
कॉलिटी बेकरीतील स्वच्छतेचा आढावा घेतल्यास, बेकरीमधील मुख्य भागात चकचकीत काचेचे फर्निचर, मोठमोठे डिस्प्ले रेफ्रिजरेटर फ्रिज ठेवण्यात आले असून, त्या डिस्प्ले रेफ्रिजरेटर फ्रिजमध्ये केक व खाद्य पदार्थ आठ-आठ दिवस साठवून थंड करून ग्राहकास विकले जाते, बेकरीच्या आतील भागातील किचनमध्ये, कमालीची घाण, अस्वच्छता, उंदीरं, किडे, मुंग्या, झुरळ पालींचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून किचन मधील सगळे पदार्थ उघड्यावर ठेवल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात किडे, झुरळी बसल्याचे निदर्शनास येते.

हा सर्व प्रकार बेकरीत उपस्थित असलेल्या इतर ग्राहकांनी पाहिल्याने तिथे एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “आम्ही विश्वासाने ज्या बेकरीत खाण्यासाठी जातो, तिथे जर अशा प्रकारे कीडे निघत असतील, तर लहान मुले आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याचे काय?” असा संतप्त सवाल ग्राहकांनी उपस्थित केला. यामुळे शहरातील बाजारपेठेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन ( एफ.डी.ए.) काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून असून, देगलूर शहरातील अनेक हॉटेल्स आणि बेकऱ्यांमध्ये अन्नसुरक्षेचा बोजवारा उडाला असल्याचे यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ बनवणे, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन सर्रास सुरू असते. कॉलिटी बेकरीमध्ये घडलेल्या या ताज्या प्रकारानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभाग ( एफ.डी.ए.) या संबंधित बेकरीवर काय धडक कारवाई करणार, याकडे संपूर्ण देगलूरकरांचे लक्ष लागले आहे.



