देगलूरनांदेडप्रशासकमराठवाडामहाराष्ट्र

भारत फॅन्सीसमोर पार्किंगचा ‘दादागिरी’ पॅटर्न !

वाहतूक कोंडी तरी देगलूर पोलीस प्रशासन गप्प का..?

Lokurja Digital

देगलूर | प्रतिनिधी

देगलूरशहरातील प्रमुख बाजारपेठेत असलेल्या भारत फॅन्सी या कपड्याच्या दुकानासमोरील रस्त्यावर होणाऱ्या अनधिकृत वाहन पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या दुचाकी, तिचाकी वाहनांसाठी हा महत्त्वाचा मार्ग असताना दुकानासमोरील रस्ताच वाहनतळ बनल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

भारत फॅन्सी हे शहरातील प्रमुख कापड दुकानांपैकी एक असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होते. दुकानात जवळपास १५० हून अधिक कामगार कार्यरत असल्याची माहिती असून, त्यापैकी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांकडे दुचाकी वाहने आहेत. त्यातच खरेदीसाठी येणारे असंख्य ग्राहकही आपली वाहने दुकानासमोरच भर रस्त्यात उभी करतात.

मात्र या मोठ्या प्रमाणातील वाहनांसाठी स्वतंत्र आणि पुरेशी अधिकृत पार्किंग व्यवस्था नसल्याने दुकानासमोरील मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याचे चित्र दिसून येते. परिणामी रस्त्याची वाहतुकीची क्षमता कमी होऊन बाजारपेठेत वारंवार कोंडी निर्माण होत आहे.

दुकान मोठे, ग्राहक मोठ्या संख्येने; मग पार्किंगची जबाबदारी कोणाची?

चार मजली व्यावसायिक इमारत उभी करताना ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे का, याची तपासणी करण्याची वेळ आली आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतील आणि शेकडो वाहने तेथे येत असतील, तर त्या वाहनांचा भार सार्वजनिक रस्त्यावर टाकणे योग्य आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. व्यवसायासाठी मोठी इमारत उभी करता येते, शेकडो ग्राहकांना आकर्षित करता येतात; मग वाहनांसाठी नियोजित पार्किंगची व्यवस्था का करता आली नाही? हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

सामान्यांच्या वाहनांवर दंड, मग भारत फॅन्सीसमोरील पार्किंगवर कारवाई का नाही?

नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी

भारत फॅन्सीसमोरील वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी करून नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा. संबंधित ठिकाणी पार्किंगची कायदेशीर व्यवस्था आहे की नाही, इमारतीच्या मंजूर आराखड्यात पार्किंगची तरतूद आहे की नाही, याची तपासणी करावी. रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

‘एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा’ नको!

पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिक आणि मोठे व्यावसायिक यांच्यासाठी वेगवेगळे निकष ठेवू नयेत. कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे पोलिस प्रशासनाने आपल्या कृतीतून दाखवून देण्याची गरज आहे.

भारत फॅन्सीसमोरील पार्किंगचा प्रश्न केवळ एका दुकानाचा नसून बाजारपेठेतील वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने केवळ एखाद्या वाहनधारकावर दंडाची कारवाई करण्याऐवजी या ठिकाणी निर्माण होणाऱ्या अनधिकृत पार्किंगच्या मूळ समस्येवरच कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

आता नगर परिषद आणि पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे गांभीर्याने पाहून कारवाई करणार की वाहतूक कोंडीचा हा खेळ असाच सुरू राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button