
Lokurja Diigital
देगलूर | प्रतिनिधी
देगलूर – शहरातील शिक्षण क्षेत्राची प्रतिमा मलिन करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने एका संस्थेवरील भोंगळा तडजोडीचा कारभार उघडकीस आला आहे.
लातूर बोर्डाने रामपूर रोडवरील त्या शाळेची उच्चस्तरीय समिती मार्फत पारदर्शक चौकशी करून, त्या संस्थेचा काळाबाजार बाहेर काढून संस्थेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
देगलूर शहरातील एका रामपूर रोडवरील नामांकित शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक, ३ शिक्षक, १ सेवक आणि लातूर येथील शिक्षण विभागाशी संबंधित तपासणी अधिकाऱ्याने सदरील शाळा तपासणीच्या अधिकृत भेटीनंतर त्या लातूरच्या अधिकाऱ्यास खुश करण्यासाठी शहरातील एका ढाब्यावर दांडगी रक्कम, विदेशी दारू, गावरान कोंबड्याची सोय केल्याची माहिती आहे.
या पार्टीदरम्यान मुख्याध्यापक, शिक्षक व लातूरच्या त्या अधिकाऱ्याने मनसोक्त दारू आणि कोंबड्यावर ताव मारला पण, पार्टी दरम्यान तेथे उपस्थित शहरातील काही स्थानिक तरुण आणि मुख्याध्यापक यांच्यात एका शुल्लक कारणावरून जोरदार झटापट झाल्याची घटना घडली, या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जवळपास १५ दिवसापूर्वी लातूर बोर्डाचे सरकारी तपासणी अधिकारी शहरातील रामपूर रोडवरील एका नामांकित विद्यालयाच्या अधिकृत तपासणीसाठी आले होते.
मात्र, कर्तव्याला हरताळ फासत मुख्याध्यापक आणि ३ शिक्षकांनी त्या तपासणी अधिकाऱ्याला खुश करून संबंधित शाळेतील गैरप्रकार उघडकीस आणू नये यासाठी भरदिवसा शाळेच्या वेळेत सुट्टी मारून त्या अधिकाऱ्यास थेट शहरातील एका ढाब्यावर बसविले. धाब्यावर सर्वांसाठी विदेशी दारू आणि गावरान कोंबड्याची जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती.
त्यातील काहीजन दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद झाले असताना, ढाब्यावर उपस्थित असलेल्या काही स्थानिक तरुणांसोबत त्यांची कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली. नशेत असलेल्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी त्या तरुणांशी उद्धट वर्तन केल्याने वाद आणखीनच जास्त चिघळला. याचे पर्यावसान अखेर थेट हाणामारीत झाले.

संतप्त तरुण आणि मद्यधुंद मुख्याध्यापकांमध्ये ढाब्यावरच जोरदार झटापट सह मारामारी सुरू झाली.विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे देणारे शिक्षक आणि शाळांची तपासणी करणारे उच्चपदस्थ अधिकारीच अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर असताना दारू पिऊन राडा घालत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर ( सोशल मीडियावर ) वायरल झाल्याने पालक आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी त्या लातूरच्या अधिकाऱ्यांसह , शाळेच्या शिक्षकांवर आता शिक्षण विभाग काय कारवाई करणार , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कारवाईची मागणीअशा बेजबाबदार आणि चारित्र्यहीन शिक्षकांमुळे देगलूरची संपूर्ण शैक्षणिक संस्था बदनाम होत असून संबंधित मुख्याध्यापक, ३ शिक्षक ,१ सेवक आणि लातूर बोर्डाच्या त्या तपासणी अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये , हा प्रश्न नागरिकांतुन उपस्थित केला जात आहे.



