
भोसले आणि देशमुख यांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नसून, आरोपी गजाआड होईपर्यंत त्यांना पोलीस प्रशासनाने सुरक्षा पुरवावी अशी मागणी पत्रकार संघटना करीत आहेत.
Lokurja Digital
नांदेड – लालवाडी (ता. कंधार) गावाजवळ दोन पत्रकारांच्या दुचाकीला पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या कारने सलग ३ वेळा धडक देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी (२८ जून ) रोजी दुपारी जवळपास दीड वाजेच्या सुमारास घडली. घटनेत दोन्ही पत्रकार जखमी झाले असून अज्ञात कारचालका विरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रवीणकुमार व्यंकटराव देशमुख (वय ३७) आणि त्यांचे सहकारी यशपाल अर्जुन भोसले हे बहादरपुरा येथे वृत्तसंकलनासाठी दुचाकीने जात होते. दुपारी दीडच्या सुमारास लालवाडी गावाजवळ पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला २ वेळा धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला असता त्याने दुचाकीला तिसऱ्यांदा जोरदार धडक दिल्याचा आरोप फिर्यादीने केला.या धडकेमुळे दोन्ही पत्रकार रस्त्यावर सुमारे १५ ते २० फूट फरफटत गेले. प्रवीणकुमार देशमुख यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्त्राव झाला, तर दोन्ही हात व उजव्या पायाला दुखापत झाली. दुचाकीचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.स्थानिक नागरिकांनी जखमींना मदत करून उपचारासाठी कंधार येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (ता. २९) कंधार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. तपास कॉन्स्टेबल शिवाजी सानप करीत आहेत.



