भाजपाच्या केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर देगलूरमध्ये विजयोत्सव..!
आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी देगलूर मध्ये निघाला होता मोर्चा

Lokurja Digital
देगलूर – प्रतिनिधी
देगलूर – केंद्रीय कॅबिनेट मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देगलूर शहरात युवकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला.
नीट पेपर लीक प्रकरणात विद्यार्थी आणि युवकांच्या रोखठोक आंदोलनाला यश आल्याचा दावा कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतर-मंतरसह देशभरात कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे करण्यात येत होती. नीट परीक्षेतील अनियमितता, पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील घोळ या मुद्द्यांवर युवकांनी सतत दबाव टाकला.
देगलूरमध्येही या आंदोलनाला स्थानिक युवकांचा पाठिंबा होता. राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर देगलूर शहरातील माजी नगरसेवक सुशिलकुमार देगलूरकर,आंबेडकरवादी अशोक कांबळे , काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष विकास नरबागे, मिलिंद कावळगावकर, रमेश गुळेकर, पत्रकार सतीश पांडवे आदी युवक शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमत फटाके फोडून, घोषणाबाजी करून आनंदाने जल्लोष करून विजयोत्सव साजरा केला. “आंदोलन यशस्वी झाले, विद्यार्थ्यांच्या आवाजाला बळ मिळाले,” अशी भावना युवकांमध्ये होती.
युवकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हा विजय सामाजिक न्यायाचा आणि युवक शक्तीचा प्रतीक म्हणून साजरा केल्याचे सांगितले. शहरातील विविध पक्षातील युवा समर्थकांनी या प्रसंगाचे स्वागत केले. त्यांच्या मते, केवळ निषेध न करता रोखठोक आणि सातत्यपूर्ण आंदोलनाने सरकारला झुकण्यास भाग पाडले.
राजकीय वर्तुळातही या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, युवक आंदोलनाने केंद्र सरकारला शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले.तथापि, राजीनाम्यानंतर पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन शिक्षण मंत्री कोण येणार, नीटसारख्या परीक्षा प्रक्रियांमध्ये सुधारणा होतील का आणि विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांबाबत सरकार काय भूमिका घेईल, हे आता स्पष्ट होईल.
देगलूर शहरातही युवकांनी आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हा विजय साजरा केल्याने आंदोलनाचा प्रभाव केवळ दिल्लीपुरता मर्यादित नसल्याचे दिसून आले. कॉक्रोच जनता पार्टीच्या या यशाने राजकीय पक्षांनाही युवकांच्या रोषाला गांभीर्याने घेण्याची आठवण करून दिली आहे.



