
Lokurja Digital
देगलूर|प्रतिनिधी
देगलूर – उद्घाटनाचा जल्लोष, ढोल-ताशे, मिरवणुका, फोटोग्राफी, श्रेय घेण्याची स्पर्धा… आणि अवघ्या महिनाभरातच इलेक्ट्रिक बस ट्रॅक्टरला टोचन लावून ओढावी लागते? हा नेमका विकासाचा उत्सव होता की केवळ प्रसिद्धीचा कार्यक्रम, असा सवाल आता देगलूरकर विचारू लागले आहेत.
देगलूर शहराला ५ इलेक्ट्रिक बस मिळाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी जणू राजकीय स्पर्धाच लागली होती. “बस आम्ही आणल्या”, “विकास आम्ही केला”, अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. शहरभर मिरवणूक काढून या बसचे असे स्वागत करण्यात आले की, जणू देगलूर सार्वजनिक वाहतुकीच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. मात्र, वास्तव फार काळ लपून राहिले नाही. महिनाही पूर्ण होत नाही तोच एका इलेक्ट्रिक बसला अख्ख्या गावच्या डोळ्यासमोर ट्रॅक्टरने टोचण लाऊन ओढून न्यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
देगलूरकरांना विकासाचा दिखावा नको आहे; त्यांना टिकाऊ, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक सेवा हवी आहे. इलेक्ट्रिक बस हा आधुनिकतेचा चेहरा असू शकतो, पण त्या ट्रॅक्टरच्या भरोशावर चालू लागल्या तर जनतेच्या पैशातून उभारलेल्या योजनांवरच प्रश्नचिन्ह उभे राहते.
या घटनेने उद्घाटनाच्या भपक्याला मोठा धक्का बसला आहे. जनतेचा प्रश्न सरळ आहे, बस आणून फीत कापणे महत्त्वाचे की त्या बस रोज व्यवस्थित धावतील याची खात्री करणे महत्त्वाचे? जर बस महिनाभरात बंद पडत असतील, तर त्यामागील कारण काय? तांत्रिक दोष, देखभालीचा अभाव, चार्जिंग व्यवस्थेतील त्रुटी की अन्य काही? याचे उत्तर संबंधित प्रशासनाने आणि परिवहन विभागाने जनतेसमोर ठेवले पाहिजे.

लोकप्रतिनिधींनी श्रेयाच्या पोस्टरपेक्षा उत्तरदायित्वाचे उत्तर द्यावे. कारण जनतेला फोटोशूट नको, तर वेळेवर धावणारी बस हवी आहे. उद्घाटनाच्या दिवशी विकासाचे ढोल वाजवणाऱ्यांनी आज या बसची ही अवस्था पाहून मौन का बाळगले आहे? देगलूरकरांना विकासाचा दिखावा नको आहे; त्यांना टिकाऊ, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक सेवा हवी आहे. इलेक्ट्रिक बस हा आधुनिकतेचा चेहरा असू शकतो, पण त्या ट्रॅक्टरच्या भरोशावर चालू लागल्या तर जनतेच्या पैशातून उभारलेल्या योजनांवरच प्रश्नचिन्ह उभे राहते.



