देगलूरातील सरस्वती विद्यालयमात कोंबड्यांसारखी विद्यार्थ्यांची कोंडी.!
गुणवत्तेचा गवगवा.. शिक्षण विभागाच्या डोळ्यावर पट्टी?

Lokurja Digital
देगलूर | प्रतिनिधी
देगलूर – शहरातील सरस्वती विद्यालयम इंग्लिश मीडियम मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नावाखाली अमानुष परिस्थितीत बसविले जात असल्याची गंभीर तक्रार समोर येत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गवगवा करणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.
माहितीनुसार, अवघ्या १०×१० फुटांच्या वर्गखोल्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबड्यासारखे कोंबून बसविले जाते. एका बाकावर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसावे लागत असल्याने त्यांना नीट लिहिणे, वाचणे किंवा हालचाल करणेही कठीण होते. काही वेळा जागा अपुरी पडल्यामुळे एका छोट्याशा लाकडी बाकावर चार-चार विद्यार्थ्यांना बसविल्याचाही आरोप आहे. तसेच कोणत्याही वर्गात पुरेसा प्रकाश नसल्याने अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर मानसिक आणि शारीरिक ताण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, शाळेतील अनेक पंखे बंद अवस्थेत असल्याने उकाड्यात विद्यार्थ्यांचे हाल तर होतातच शिवाय चालू पावसाळ्याच्या दिवसात शाळेच्या अवतीभवती पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत प्रवेश करावे लागते. शाळेतील वर्गखोल्यांमध्ये डास आणि इतर किटकांचा मोठा त्रास असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. डेंग्यूसारख्या आजारांचा धोका असतानाही योग्य स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार आहे.
लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांची भीती इतकी निर्माण झाली आहे की ते शाळेत कोणतीही तक्रार करण्याचे धाडस करत नाहीत. अनेक विद्यार्थी घरी जाऊन पालकांकडे आपली व्यथा मांडतात. मात्र, मुलांच्या शिक्षणाच्या भीतीने किंवा शाळेच्या दबावामुळे अनेक पालक उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत.
खेळाच्या मैदानाचाही गंभीर प्रश्न समोर आला आहे. विद्यार्थ्यांना स्वतंत्र मैदान नसल्याने रस्त्यावर खेळ खेळविले जातात. मुलांच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेले सुरक्षित आणि प्रशस्त मैदान नसल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या सर्व प्रकारांनंतरही स्थानिक शिक्षण विभागाकडून या शाळेची सखोल चौकशी का केली जात नाही? संबंधित शाळेच्या संस्था चालकांवर कारवाई का होत नाही? शिक्षण अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे का? असे अनेक प्रश्न पालक आणि नागरिक उपस्थित करत आहेत.



