ग्रामीणदेगलूरनांदेडमराठवाडामहाराष्ट्र

आमची माती, आमची माणसं’ परिवारातर्फे शहापूर येथे भव्य स्पर्धांचा जागर

संवादातून गावच्या विकासाचे नवे पर्व

Lokurja Digital

प्रतिनिधी | देगलूर

देगलूर – “चर्चेतून संवाद आणि संवादातून गावचा विकास” हे प्रेरणादायी ब्रीदवाक्य उराशी बाळगून अविरतपणे कार्यरत असलेल्या ‘आमची माती, आमची माणसं’ या शहापूरच्या व्हॉट्सॲप समूहाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मंच मिळवून देण्यासाठी भव्य निबंध, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धांचे (पर्व २) धमाकेदार आयोजन करण्यात आले आहे.

स्थापनेपासूनच या समूहाने गावात विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांची चळवळ उभारून लोकजागृतीचा ध्यास घेतला आहे. शेतीविषयक मार्गदर्शन, बाजारभाव, हवामान अंदाज, आरोग्य सल्ला, नोकरी व स्पर्धा परीक्षांच्या संधी, शासकीय योजना आणि पंढरीच्या वारीची आध्यात्मिक संस्कृती गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य हा समूह सातत्याने करत आहे. गावातील अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून प्रत्यक्ष विकासकामे मार्गी लावण्यात या समूहाचे योगदान मोलाचे ठरले आहे. “आमची माती, आमची माणसं परिवार, शहापूर हा एका व्यक्तीच्या विचारापुरता मर्यादित नसून गावच्या प्रत्येकाच्या हक्काचे व्यासपीठ आहे,” असे प्रतिपादन समूहाचे सर्वेसर्वा प्रतीक देशमुख यांनी केले आहे.

याच सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला उडान मिळावी आणि मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत राहावी, या उद्देशाने इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद हायस्कूल, शहापूर येथे या भरगच्च स्पर्धांचा थरार रंगणार आहे.या स्पर्धेत निबंधासाठी ‘माझं गाव, माझी माणसं’, ‘माझी ग्रामपंचायत: गावाचा विकास आणि आपली जबाबदारी’, ‘माझा आवडता सण / माझा भारत देश’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ व ‘मोबाईलचे फायदे आणि तोटे’ हे प्रबोधनात्मक विषय आहेत.

रांगोळी स्पर्धेत ‘माझं सुंदर व स्वच्छ गाव’, ‘माझा देश, माझा तिरंगा’, ‘झाडे वाचवा, पाणी वाचवा’, ‘मुलगी शिकवा, देश घडवा’ व ‘भारतीय संस्कृती व सण’ या कल्पक थीमवर रंगांची उधळण पाहायला मिळेल. तर वक्तृत्व स्पर्धेत ‘माझं गाव, माझी ग्रामपंचायत’, ‘स्वातंत्र्यदिन आणि आपले कर्तव्य’, ‘माझे आवडते राष्ट्रपुरुष’, ‘वाचनाचे महत्त्व: पुस्तके आपले मित्र’ व ‘स्वच्छता हीच खरी सेवा’ या विषयांवर विद्यार्थ्यांची वक्तृत्वशैली पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम ₹ २,१११/-, द्वितीय ₹ १,१११/- आणि तृतीय ₹ ५५५/- अशी आकर्षक रोख पारितोषिके व मानाचे स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. याव्यतिरिक्त ‘बाला विकास पाणी शुद्धीकरण प्रकल्प, शहापूर’ यांच्या सौजन्याने सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरवले जाणार आहे. रांगोळीचे साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणायचे असून निबंधासाठी लागणारा कागद आयोजकांकडून पुरवला जाणार आहे.

सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी दूध-बिस्किटची विशेष सोय करण्यात आली आहे.स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य दिवशी जि. प. हायस्कूल, शहापूर येथे भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. या गुणदर्शन सोहळ्यात परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या कौशल्याचा डंका वाजवावा, असे आवाहन ‘आमची माती, आमची माणसं’ समूहाचे सर्वेसर्वा प्रतीक देशमुख, आयोजक कपिल यनगुलवार (९०११५१७३१०), ज्ञानेश्वर गुंतापल्ले (९५५२९३८५१७), गोपाळ पडमटवार (९५६१०४०४३९) आणि संपूर्ण परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button