नांदेडमराठवाडामहाराष्ट्रराजकीय

नांदेड जिल्हा बँक अध्यक्षपदावर अचानक भाजप आमदाराचे नाव फायनल ?

थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडून नावाची शिफारस आल्याची चर्चा

Lokurja Digital

प्रतिनिधी | नांदेड

नांदेड – नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शेतकरी विकास पॅनलची सत्ता आल्यानंतर येत्या १० ऑगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडला जाणार आहे. खासदार अशोकराव चव्हाण यांनी या संदर्भात नुकतीच नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेतली. आतापर्यंत बी.आर.कदम, मारोतराव कवळे ही दोन नावेच अध्यक्षपदाच्या चर्चेत घेतली जात होती.

यात आता भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नावाची भर पडली आहे. त्यांच्या नावाची शिफारस थेट मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्याची चर्चा पक्षाच्या गोटातच सुरू आहे. अशोकराव चव्हाण यांनी शुक्रवारी सर्व संचालकांशी चर्चा केली, त्यांचे मत जाणून घेतले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांच्या निवडीचे अधिकार अशोकराव चव्हाण यांनाच देण्यात आले आहेत. अध्यक्ष पद भाजप समर्थक संचालकालाच मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे.

२३ पैकी २१ संचालक हे शेतकरी विकास पॅनलचे आहेत. यात १४ संचालक हे भाजपशी संबंधित तर प्रत्येक तीन संचालक हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. जिल्हा बँकेवर अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीची सत्ता आल्यानंतर अध्यक्षपद भाजप पक्षाकडे जाणार आहे.

यात प्रामुख्याने अशोक चव्हाण यांच्या आमदार कन्या श्रीजया चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघाला ही संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये बी.आर.कदम यांचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सोमवारी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.

भाजपच्या निवडून आलेल्या संचालकांमध्ये दोन आमदार, एक आमदार पत्नी तर एका आमदाराच्या मुलीचा समावेश आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत आमदार डॉ.तुषार राठोड यांचे नाव अचानक समोर आल्याने अध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button